*नवीन कार्यकारिणी तत्काळ जाहीर करण्यात येणार : श्रीकांत दोड, जिल्हाध्यक्ष (आप)*
वर्धा (टीम विदर्भ संदेश): जिल्हा आम आदमी पार्टीची विद्यमान जिल्हा कार्यकारिणी तत्काळ प्रभावाने बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती आप जिल्हाध्यक्ष श्रीकांत दोड यांनी दिली. पक्ष संघटन अधिक मजबूत, शिस्तबद्ध व विश्वासार्ह ठेवण्यासाठी हा निर्णय अत्यंत आवश्यक होता, असे त्यांनी स्पष्ट केले.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या नगर परिषद निवडणुकांच्या कालावधीत काही पदाधिकाऱ्यांकडून पक्षशिस्तीचा भंग झाल्याच्या तक्रारी पक्ष नेतृत्वाकडे प्राप्त झाल्या होत्या. या पार्श्वभूमीवर सखोल विचारविनिमयानंतर संबंधित पदाधिकाऱ्यांवर ६ वर्षांसाठी पक्षातून निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
भविष्यात कोणत्याही पदाधिकाऱ्यांच्या वतीने पक्षशिस्त, पक्षनिष्ठा व संघटनात्मक विश्वासाला तडा जाणार नाही, यासाठी ही कठोर पण आवश्यक कारवाई करण्यात आली असल्याचे श्रीकांत दोड यांनी सांगितले. आम आदमी पार्टीमध्ये शिस्त, पारदर्शकता आणि लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य असून, त्याला बाधा पोहोचवणारी कोणतीही कृती खपवून घेतली जाणार नाही, असा ठाम इशाराही त्यांनी दिला.
तसेच लवकरच नवीन जिल्हा कार्यकारिणीची घोषणा करण्यात येणार असून, नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून पक्ष संघटन अधिक गतिमान, लोकाभिमुख आणि प्रभावी करण्यावर भर दिला जाईल, असेही त्यांनी नमूद केले
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940