पालकमंत्र्यांकडून जिल्हा नियोजन समितीचा आढावा.
वार्षिक योजनेची कामे गुणवत्तापुर्वक करण्याचे निर्देश.
वर्धा, दि. 23: जिल्ह्याच्या विकासासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून विविध विभागांना निधी दिला जातो. हा निधी कोणत्याही परिस्थितीत शासनास परत न जाता शंभर टक्के खर्च झाला पाहिजे. या योजनेतून कामे करतांना गुणवत्तापुर्वक करा. विकासाची चांगली कामे करून जिल्ह्याचे नाव लौकिक कसे करता येतील यासाठी विभागांनी प्रयत्न करावे, अशा सूचना पालकमंत्री डॅा.पंकज भोयर यांनी केल्या.
नियोजन भवन येथे पालकमंत्र्यांनी मागील वर्षातील सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना, अनुसूचित जाती उपयोजना व आदिवासी उपयोजनेचा झालेला खर्च, या आर्थिक वर्षातील या तिनही योजनेतून मे महिना अखेरपर्यंत झालेल्या खर्चाचा आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते.
बैठकीला पालकमंत्र्यांसह खा.अमर काळे, आ.दादाराव केचे, आ.समीर कुणावार, आ.सुमित वानखेडे, आ.राजेश बकाने, जिल्हाधिकारी वान्मथी सी, मुख्य कार्यकारी अधिकारी पराग सोमन, जिल्हा पोलिस अधीक्षक अनुराग जैन, उपवनसंरक्षक हरविर सिंह, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरज गोहाड, जिल्हा नियोजन अधिकारी अनिरुद्ध राजुरवार यांच्यासह सर्व विभागप्रमुख अधिकारी उपस्थित होते.
सुरुवातीस जिल्हाधिकारी वान्मथी सी यांनी मागील वर्षाचा खर्च व यावर्षातील आतापर्यंत झालेल्या खर्चाची माहिती सादर केली. मागील वर्षी तिनही योजनेतून ३७४ कोटी ४५ लाख ६२ हजार इतका निधी मंजूर होता. त्यापैकी ३७४ कोटी ४३ लाख ६२ हजार इतका खर्च झाला. खर्चाची टक्केवारी ९९.९९ इतकी आहे. मागील वर्षात सर्व यंत्रणांनी केलेल्या उत्कृष्ट कामासाठी पालकमंत्र्यांनी कौतूक केले. यावर्षी सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेत ३५० कोटी, अनुसूचित जाती उपयोजना ४४ कोटी तर आदिवासी उपयोजनेत १८ कोटी ७० लाख असे ४१२ कोटी ७० लाख रुपये मंजूर आहेत.
या निधीतून जिल्ह्यात विकासाची चांगली कामे करा. प्रस्ताव करतांना लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्या. त्यांची मान्यता घेऊन प्रशासकीय मान्यता व निधी खर्च करण्याची कारवाई करण्यात यावी. खर्च करतांना विकास कामे देखील चांगली होणे आवश्यक आहे. विभागप्रमुखाने कामांच्या गुणवत्तेची दक्षता घ्यावी. आपल्या विभागाची कामे अधिक चांगली आणि जिल्ह्याच्या विकासाला हातभार लावणारी कशी होतील, याकडे लक्ष देण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी केल्या.
…तोवर कंत्राटदारांची देयके थांबवा
वर्धा जिल्ह्याचे ठिकाण आहे, त्यामुळे साहजिकच शहरातील विविध मैदानांवर वर्षभर विविध कार्यक्रम होत असतात. कार्यक्रमानंतर मैदान पुर्णपणे स्वच्छ, निटनेटके व पुर्वीप्रमाणे होणे आवश्यक आहे. तसे होत नसल्याने मैदानांवर सराव करणारे खेळाडू तसेच नागरिकांना त्रास सहन करावा लागतो. सद्या सर्व मैदानांवरील स्वच्छता व निटनेटकेपणाची कामे झाली नसेल तर त्वरीत करून घ्या, तोवर संबंधित कंत्राटदारांचे देयके थांबवा असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
…त्या सोयाबीन बियाण्याची चौकशी करण्याचे निर्देश
जिल्ह्यात वरुण नावाचे सोयाबिनचे बियाणे विकले जात आहे. हे बियाणे गुणवत्तेचे नसल्याची बाब आ.बकाने यांनी बैठकीत मांडली. यामुळे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर नुकसान सोसावे लागणार असल्याची शक्यता असल्याने कृषी विभागाने या बियाण्यांचा किती साठा जिल्ह्यात आहे, हे तपासून बियाण्यांची तत्काळ चौकशी करण्याचे आदेश दिले.
बालवैज्ञानिक देतील इस्त्रोला भेट
दरवर्षी तालुका व जिल्हास्तरावर विज्ञान प्रदर्शनी आयोजित केली जाते. यातील बाल वैज्ञानिकांना नागपूर येथील रमन विज्ञान केंद्र व जिल्हास्तरावर निवडलेल्या ५१ बालकांना बंगळूर येथील इस्त्रोच्या केंद्राला भेट देण्याचे नियोजन करा. जिल्ह्यात बालकांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देऊन चांगले वैद्यानिक घडविण्यासाठी प्रयत्न करण्यात यावे.
यावेळी खा.अमर काळे, आ.दादाराव केचे, आ.समीर कुणावार, आ.सुमित वानखेडे, आ.राजेश बकाने यांनी विविध प्रकारच्या सूचना केल्या. रुग्णालयांमध्ये आवश्यक औषधांची उपलब्धता, शिक्षकांची रिक्त पदे, शाळा, अंगणवाडी बांधकाम व सुरक्षा भिंत, स्मशानभुमीस जाणारे रस्ते, ग्रामसडक योजनेची अपुर्ण कामे, घरकुल लाभार्थ्यांना पट्ट्यांचे वाटप व मोजणी, सुरक्षा कुंपनासाठी जंगलालगतच्या गावांचा समावेश, हातपंप दुरुस्ती, मागील वर्षातील प्रलंबित कामे, सेवाग्राम पाणी पुरवठा योजनेचे वाढीव काम, जलजीवन मिशनची कामांना गती, आर्वी शहरातील नागरिकांना मालमत्ता पत्रक, वन्यप्राण्यांपासून पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपाययोजना, आर्वी येथे शिवाजी महाराजांचा नवीन पुतळा बसविणे, बॅंकांकडून अनुदानाची परस्पर कपात, आर्वी शहरातील अंडरग्राऊंड ड्रेनेज, जळालेल्या रुग्णांवर उपचार अशा सूचनांचा समावेश आहे. या सूचनांवर तातडीने कार्यवाही करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.
Author: vidarbhasandeshnews
भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰







Total Users : 3256
Total views : 4940