How to Become a Digital Journalist
Home » ई-पेपर » वर्धा » पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी.

पालकमंत्री डॉ.पंकज भोयर यांनी केली अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या घरांची पाहणी.

▪️सानुग्रह मदत तत्काळ देण्याच्या केल्या सूचना.

वर्धा, दि.12: राज्याचे गृह (ग्रामीण), गृहनिर्माण, शालेय शिक्षण, सहकार व खनिकर्म राज्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी आज अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पवनार येथील घरांची पाहणी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्तांशी संवाद साधला तसेच नुकसानग्रस्तांना सानुग्रह मदतीचे वाटप तातडीने करण्याच्या सूचना केल्या.

यावेळी उपविभागीय अधिकारी दिपक कारंडे यांच्यासह तहसिलदार संदीप पुंडेकर तसेच अन्य महसूल अधिकारी व तलाठी उपस्थित होते. जिल्ह्यात दिनांक 7 ते 9 जुलै या कालावधीत मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली. यात जिल्हाभर ठिकठिकाणी शेती, शेत पिके व घरांचे नुकसान झाले. तीन दिवसांपूर्वी आढावा घेऊन पालकमंत्र्यांनी नुकसानीचे पंचनामे तातडीने करण्याच्या सूचना केल्या होत्या. आज त्यांनी प्रत्यक्ष नुकसानग्रस्तांकडे जाऊन पाहणी केली व त्यांच्याशी संवाद साधला.

पवनार येथे अतिवृष्टीमुळे दिनकर येरुणकर यांच्या घराची पडझड झाली होती. पालकमंत्र्यांनी त्यांच्या नुकसानीची पाहणी केली व संवाद साधला तसेच त्यांना तत्काळ सानुग्रह मदत देण्याच्या सूचना केल्या. अतिवृष्टीत जिल्ह्यातील 54 महसूल मंडळापैकी 50 मंडळामध्ये अतिवृष्टी झाली होती.

या अतिवृष्टीमुळे नदी नाल्यांना पूर येऊन काही प्रमाणात रस्त्याचे व पुलांच्या नुकसानीसह नदीकाठावरील घरांची पडझड झालेली होती. पडझड झालेल्यांना सानुग्रह मदत देऊन त्यांना आवास योजनेचा लाभ देण्यासाठी प्रयत्न करावे, अशाही सूचना यावेळी डॉ. पंकज भोयर यांनी दिल्यात. तलाठी, ग्रामसेवक व कृषिसेवक यांच्या मदतीने पडझड झालेल्या घर, गोठे व शेत पिकांचे संयुक्त पंचनामे करुन शासनास अहवाल सादर करावा. एकही नुकसानग्रस्त पंचनाम्यातून सुटता कामा नये, असे पालकमंत्र्यांनी सांगितले.

यावेळी पवनार येथील केळी उत्पादक शेतकऱ्यांनी मागील अवकाळी पावसामुळे केळी पिकाचे नुकसान झाल्याचे सांगून फळपिक विमा उतरविला असतांना सुध्दा अद्यापपर्यंत लाभ मिळालेला नसल्याचे सांगितले. यावर डॉ.पंकज भोयर यांनी विमा योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यावेळी दिपक कारंडे यांनी वर्धा, सेलू व देवळी महसूल मंडळात अतिवृष्टीमुळे जवळपास 32 घरे व गोठ्यांचे अंशत: नुकसान झाले असून देवळी मध्ये एक गाय गोठ्याची भिंत पडून मृत पावल्याचे सांगितले.

vidarbhasandeshnews
Author: vidarbhasandeshnews

भ्रष्टाचार करणार उघड ॰॰॰

इस खबर पर अपनी प्रतिक्रिया जारी करें

Leave a Comment

Share This